Thursday, 1 March 2012

पान नं ७ वरून पुढे...........................

            महादेव दामोदर पंतांच्या हातातील पत्र घेतो. त्याला वाचायला अडचण होऊ नये म्हणून दामोदरपंत माजघरात निघून जातात. महादेवला आईची आठवण कधी आली नाही असे नाही. खूप वेळा त्याने आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला. आई लहानपणी म्हणाली होती " महादेव तुला माझी आठवण आली कि नदीवर ये मी तुला नदीवर नक्की भेटेन." महादेव खूप वेळा नदीवर जायचा खूप वेळा त्याने जानकीला शोधण्याचे प्रयत्न केले पण त्याला कधीच जानकी भेटली नाही. आईच्या आठवणीने तो रात्री एकटाच कुशीत रडत बसायचा. एक दिवस बाजूला झोपलेल्या आनंदीबाईना महादेवच्या हुंदक्यांचा आवाज आला त्यांना उमगले महादेव ला आईची आठवण येत आहे
           " पोरा महादेवा , आईची आठवण येत आहे होय." आनंदीबाई त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात.
            " नाही मोठ्या आई ." महादेव आपले डोळे पुसत बोलतो.
           " म्हणजे तू मला आई नाही मानत ना? " आनंदीबाई
           " असा कधी म्हणालो मी ?" महादेव.
           " मग माझ्या प्रेमात काय कमी पडले पोरा जे तुला आपल्या आईची आठवण आली." आनंदीबाई असे म्हणताच महादेव आपली कुस बदलून आनंदीबाईना मिठी मारतो.
          " नाही मोठ्या आई मला तुम्ही माझ्या खऱ्या आईपेक्षा श्रेष्ठ आहात. मला जर कुणी तुम्ही आणि माझी आई यातील एकाची निवड करायला सांगितली तर मी तुमची निवड करेन." महादेव.
           " मग मला मोठ्या आई न म्हणता फक्त 'आई' म्हण पाहू " आनंदीबाई.
           " आई ." असे म्हणून आनंदी बाई ना बिलगतो.
         ती रात्र निघून जाते महादेव सकाळी उठतो देवाची पूजा करतो. आज तो मनाशी ठरवतो आज आईला काही झाले तरी शोधून काढायचे. त्यासाठी काही करायला लागले तरी चालेल पण आज ती नाही भेटली तर तिला कायमचे विसरायचे. तो नदीकाठावर जातो सारा नदीकाठ पिंजून काढतो पण त्याला तो मिळत नाही. तो आपल्या स्वत्ताच्या गावात जातो. घरी पाहतो तर जिथे त्याचे घर होते ते पडले होते मध्ये असणारा लाकडाचा खं मात्र उभा होता. त्यावर एक मधमाशीचे पोळे होते.आपल्या घराची अशी अवस्था का झाली असावी हे त्याला उमगत नाही. तो घाबरत- घाबरत थोडे दूर असणाऱ्या जोश्याना आई बद्दल काहीतरी माहित असेल म्हणून तेथे जातो. त्याला पाहून अंगणात खेळत असणारा जोश्यांचा मुलगा गजानन धावत त्याच्या जवळ येतो.
          "महादेव  कुठे गेला होतास ? किती दिवस मी तुझी खेळायला वाट पाहतो आहे." गजानन
          " तू माझ्या आईला पाहिलीस कुठे?" महादेव.
          " नाही, तू गेल्यानंतर काही दिवस ती होती पण मग कुठे गेली ती माहीतच नाही." गजानन.
एवढ्यात जोशी काकू बाहेर येतात. महादेव ला पाहून त्यांची तळ- पायातील आग मस्तकात जाते.
        " गजानन तुला किती वेळा सांगितले त्या पांढऱ्या पायाच्या मुलाबरोबर खेळू नको म्हणून."
         " काकू मी खेळायला नाही आईला शोधायला आलो आहे. तुम्हाला माहित आहे का माझी आई कुठे आहे."महादेव विनवणी करत बोलतो.
         " बापाला खाल्लीस तर खाल्लीस आता आईला पण खाल्लीस वाटते." जोशी काकू काय बोलल्या त्या महादेवला समजले पण त्यांच्याकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळणार नाही हे त्याला माहित होते म्हणून अजून पण उतारा होण्याअगोदर आपण इथून निघून गेलेले बरे म्हणून तो तेथून निघून जातो. हताश होऊन घराकडे निघतो.रस्त्यात त्याला दामोदरपंत भेटतात.
        " बाबा, तुम्ही इकडे? " महादेव आश्चर्याने विचारतो
        " काय करू पोरा तुझ्या आईने तू रात्रीची सारी हकीगत सांगितली. आज दुपारी तू जेवायला नाही आलास आम्हाला दोघांना खूप काळजी वाटत होती म्हणून मी सारा गाव पालथा घातला तेथे तू नाही भेटलास म्हणून वाटले तू नक्की तुझ्या घरी गेला असशील म्हणून इकडे आलो."
       " बाबा कुठे गेली असेल आई? " महादेव
       " जिथे पण असेल तेथून तिला तुझी आठवण नक्की येत असेल." दामोदरपंत
       " मग ती मला भेटायला का नाही येत. तिला माहित नाही का मी तिची किती आठवण काढत असेन?" महादेव रडत बोलतो.
       " जगातील साऱ्या आईंना आपल्या मुलांची आठवण येते पोरा." दामोदरपंत त्याची समजूत काढत बोलतात.
       " मग ती मला का नाही भेटायला येत.बाबा ?"
       " तिची काहीतरी मजबुरी असेल." दामोदरपंत.
       " मग आज पासून मीही ठरवतो यापुढे मी तिला कधीच शोधणार नाही आणि कधीच तिची आठवण हि काढणार नाही ......कधीच नाही " महादेव दामोदर पंताना बिलगतो. दामोदर पंत त्याचे डोळे पुसतात. महादेव न बोलता त्यांच्या मागे मागे घराची वाट चालू लागतो
क्रमश.............
      
  

No comments:

Post a Comment